व्हॉट्सऍप कट्टा   

पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या सैतानी कृत्याने कानपूर येथील शुभम द्विवेदी यांचा बळी गेला. त्यांच्या पार्थिवाशेजारी सुन्न होऊन बसलेल्या त्यांच्या पत्नी इशान्या यांच्या या छायाचित्राने भारतीय जनमानसाला हलवून सोडले. समाज माध्यमांवर अनेकांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
पतीच्या कलेवराजवळ बसलेली ती
डोकं थोडंसं वाकलेलं
डोळे सुन्न अश्रूंना थांबवण्याचाही प्रयत्न नाही
जणू तिच्या काळजात कोणी खोलवर छिन्न केलेलं
हे दृश्य पाहून मन तुटून पडलं.
 
ती काही बोलत नव्हती पण तिचं मौन कधीच ऐकलेलं नव्हतं इतकं बोलत होतं.
त्या मौनात पतीच्या हरवलेल्या हास्याचा आवाज होता,
एकत्र घेतलेली शेवटची छायाचित्रं,
आणि ’आपण दोघं सुट्टीवर आलोय’ हे निरागस स्वप्न -
सगळं त्या क्षणात काळाच्या तोंडात गेलं होतं.
 
त्या रक्ताच्या थारोळ्यात तिचा संसार विखुरला होता
तो फक्त नवरा नव्हता -
तो तिचं खांद्यावर टेकणारं बळ होता,
त्याच्या मिठीत ती विसावणारी एक संपूर्ण दुनिया होती.
आता तो निष्प्राण आणि ती -
एकट्यानं जिवंतपणे मृत्यू सहन करणारी!
 
ते पाहून मला शब्द सुचले नाहीत,
अश्रू तर आलेच, पण त्याहीपलीकडची वेदना मनात खोलवर रुतून बसली.
हे दुःख केवळ तिचं नाही -
ते माणुसकीचं होतं, प्रेमाचं होतं, विश्वासाचं होतं
 
ती बसली होती पण उठवणं शक्य नव्हतं
कारण ती आता फक्त शरीरानं होती -
मनानं, काळजानं, आत्म्यानं - ती त्या मरणातच विरघळली होती.
 
हे दृश्य केवळ बघण्याचं नव्हतं -
ते अंतर्मनाने भोगायचं होतं
शब्द हतबल झाले आणि मन शून्य.
 
त्या नजरेत, त्या थरारात,
एक संपलेलं आयुष्य आणि एक न संपणारा शोक कायमचा कोरला गेला.
 
त्या ताईंना, त्या अश्रूंना आणि त्या वेदनेला
मनाच्या तळातून शंभर वेळा नतमस्तक श्रद्धांजली!
 

Related Articles